महानगरपालिका ,जिल्हा परिषद निवडणुका लांबणीवर
४ मार्चच्या सुनावणीकडे लक्ष
मुंबई प्रतिनिधी
राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने मिळविलेल्या घवघवीत यशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी जोमाने सुरू करण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयामध्ये ओबीसी आरक्षणाबाबत आता 4 मार्च रोजी सुनावणी होणार आहे. सुनावणी पुन्हा एकदा ढकलण्यात आल्यामुळे राज्यातील 25 महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांना पावसाळ्यानंतरच किंवा दिवाळीचाच मुहूर्त मिळण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.
मुंबई पुणे नाशिक जळगाव सह अनेक महानगरपालिका यांची मुदत संपून तीन वर्षाहून अधिक काळ उलटला असून सर्वच ठिकाणी प्रशासकांच्या हाती कारभार आला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसींसाठी राजकीय आरक्षण, नगरसेवकांची संख्या, प्रभाग रचना अशा विविध मुद्द्यांवरून न्यायालयात दाखल झालेल्या अनेक याचिका एकत्र करून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. जवळपास दीड वर्षापासून या याचिका प्रलंबित आहेत. याआधी २२ जानेवारीला या वर्षातील पहिलीच सुनावणी होणार होती. आता ४ मार्चची तारीख देण्यात आली आहे.