बिहारमध्ये तनिष्क शोरूमवर भर दिवसा 25 कोटींचा दरोडा (पहा व्हिडिओ)
सीसीटीव्हीत कैद झाली धक्कादायक घटना
पाटणा वृत्तसंस्था
बिहारच्या आऱाह शहरातील गोपाळी चौकात एका नामांकित तनिष्क ज्वेलरी शोरुममध्ये भरदिवसा तब्बल 25 कोटी रुपयांच्या दागिन्यांची लूट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
https://x.com/i/status/1899047217278963725
सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास, सशस्त्र दरोडेखोरांनी शोरुममध्ये घुसून कर्मचाऱ्यांना धमकावले आणि सोने, चांदी आणि हिऱ्याचे दागिने बॅगमध्ये भरून पसार झाले. हा संपूर्ण प्रकार शोरुममध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे.
दरोड्याची माहिती मिळताच भोजपूर जिल्ह्याचे एसपी आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तपास सुरू केला असून गुन्हेगारांची ओळख पटवण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.
पोलिसांवर उठले प्रश्नचिन्ह
विशेष म्हणजे, जिथे हा दरोडा झाला, त्या शोरुमपासून केवळ 600 मीटर अंतरावर नगर पोलिस ठाणे आहे. मात्र, पोलिस तिथे पोहोचण्याआधीच गुन्हेगारांनी मोठ्या शिताफीने लूट करून पळ काढला. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
रोख रकमेच्या मूल्यांकनावरही प्रक्रिया सुरू असून, या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.