Wednesday, November 19, 2025
Homeताज्या बातम्यापवईत ओलीस नाट्याचा थरार ; एन्काउंटरमध्ये ;रोहित आर्या ठार, १७ मुलांची सुखरूप...

पवईत ओलीस नाट्याचा थरार ; एन्काउंटरमध्ये ;रोहित आर्या ठार, १७ मुलांची सुखरूप सुटका

पवईत ओलीस नाट्याचा थरार ; एन्काउंटरमध्ये ;रोहित आर्या ठार, १७ मुलांची सुखरूप सुटका

मुंबई प्रतिनिधी : मुंबईतील पवई परिसरात गुरुवारी दुपारी घडलेल्या थरारक ओलीसनाट्याचा अखेर नाट्यमय शेवट झाला. आरए स्टुडिओमध्ये ऑडिशनसाठी आलेल्या १७ मुलांना ओलीस ठेवणाऱ्या आरोपी रोहित आर्याचा पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला असून, सर्व मुलांची पोलिसांनी बाथरूममार्गे आत घुसून सुखरूप सुटका केली आहे. या घटनेने संपूर्ण मुंबई हादरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रोहित आर्य हा यूट्यूबर आणि ऑडिशन आयोजक होता. ‘अप्सरा’ नावाने तो यूट्यूब चॅनेल चालवत होता आणि अभिनय शिकवण्याचे वर्ग घेत होता. गेल्या काही दिवसांपासून तो पवईतील आरए स्टुडिओमध्ये मुलांचे ऑडिशन घेत होता. मात्र गुरुवारी दुपारी त्याने अचानक १७ मुलांना आत बंद करून ठेवले आणि बाहेर न जाण्याची सक्त मनाई केली. जेवणाच्या वेळेस मुले बाहेर न आल्याने पालकांना संशय आला. दरम्यान, रोहितने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून मुलांना ओलीस ठेवल्याची कबुली दिली.

घटनेची माहिती मिळताच पवई पोलिसांनी स्टुडिओला वेढा घातला. सुरुवातीला संवादाद्वारे आत्मसमर्पण करण्याचे आवाहन करण्यात आले, मात्र रोहितने पोलिसांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही फायरिंग केली आणि त्यात रोहित आर्या गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, पोलिसांनी स्टुडिओच्या मागील बाथरूमच्या खिडकीतून आत प्रवेश करून सर्व मुलांची सुटका केली. सर्व मुले सुरक्षित असून, त्यांना प्राथमिक वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे.

घटनेनंतर सायबर पोलिस आणि क्राईम ब्रँचचे पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. रोहितच्या या कृत्यामागचा हेतू, त्याची मानसिक स्थिती आणि सोशल मीडियावरील सक्रियता याबाबत छाननी सुरू आहे.

कोण होता रोहित आर्या?
रोहित आर्य हा पवई परिसरात अभिनयवर्ग आणि ऑडिशनशी संबंधित काम करत होता. स्वतःला फिल्ममेकर आणि मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून सादर करणारा रोहित, काही महिन्यांपासून मानसिक तणावात होता. त्याने शिक्षण विभागासाठी स्वच्छता मॉनिटरींग प्रोजेक्ट तयार केल्याचा दावा केला होता आणि सरकारकडून त्याचे पैसे न मिळाल्याने कोटींचे नुकसान झाल्याची तक्रार केली होती. याच कारणातून तो असंतुलित झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

या संपूर्ण घटनेमुळे मुंबईच्या सुरक्षाव्यवस्थेवर आणि सायबर जागृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, पोलिसांनी सखोल तपासाला सुरुवात केली आहे.

ताज्या बातम्या