ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र घरी परतले; चाहत्यांमध्ये आनंदाची लहर
मुंबई : बॉलिवूडचे हीमॅन म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र अखेर तब्येतीत सुधारणा झाल्याने बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास रुग्णालयातून घरी परतले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू होते.
देओल कुटुंबीयांनी पुढील उपचारांसाठी त्यांना घरीच ठेवण्याचा निर्णय घेतला असून, रुग्णालयातून सुटल्यानंतर त्यांच्या जुहू येथील निवासस्थानी मोठ्या आनंदात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यांच्या परतण्याची बातमी समजताच चाहत्यांमध्येही दिलासा आणि आनंदाचे वातावरण पसरले.
दरम्यान, हिंदी चित्रपटसृष्टीतील मैत्रीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या ‘शोले’ चित्रपटातील वीरू आणि जय या भूमिका साकारणाऱ्या धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांच्या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अमिताभ बच्चन यांनी घरी जाऊन धर्मेंद्र यांची प्रकृतीची चौकशी केली असून, या भेटीचे दृश्य चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू आणि चेहऱ्यावर हसू घेऊन आले.
धर्मेंद्र यांच्या घरी सध्या आयसीयूच्या सर्व सुविधा असलेली विशेष बेड व्यवस्था करण्यात आली असून, त्यांची देखरेख करण्यासाठी एकक डॉक्टर आणि चार नर्स सतत उपस्थित राहणार असल्याचे कुटुंबीयांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकरच पूर्ण सुधारणा व्हावी, यासाठी चित्रपटसृष्टीतील सहकलाकार आणि चाहते शुभेच्छा देत आहेत.
