Wednesday, November 19, 2025
Homeखानदेशजिल्हा परिषद निवडणूक: जुन्या चेहऱ्यांना संधी की नव्या चेहऱ्यांचा उदय?

जिल्हा परिषद निवडणूक: जुन्या चेहऱ्यांना संधी की नव्या चेहऱ्यांचा उदय?

जिल्हा परिषद निवडणूक: जुन्या चेहऱ्यांना संधी की नव्या चेहऱ्यांचा उदय?

जळगावात आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष ! 
जळगाव: महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात केली आहे. आज, सोमवार, १३ ऑक्टोबर २०२५ रोजी जळगाव जिल्ह्यातील ६८ गट आणि १३६ गणांच्या आरक्षण सोडतीचा होणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात गटांची सोडत होणार असून, तहसीलदार स्तरावर गणांची आरक्षण सोडत पार पडेल. या सोडतीत कोणाचे नशीब उजळणार, कोणाचे पत्ते कट होणार आणि नव्या चेहऱ्यांना कितपत संधी मिळणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे!

जिल्हा परिषदेच्या ६८ गटांसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन सभागृहात सकाळी सभा होणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित जागांची सोडत आज निश्चित होईल. यंदा नव्या आरक्षण नियमावलीमुळे जुन्या खेळाडूंना पुन्हा मैदानात उतरण्याची संधी मिळेल की नवे चेहरे संधी साधतील, याबाबत उत्सुकता ताणली गेली आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघातील आरक्षण चित्र:
अनुसूचित जाती: ६ गट
अनुसूचित जमाती: १३ गट
नागरिकांचा मागास प्रवर्ग: १८ गट
सर्वसाधारण: ३१ गट
विशेष म्हणजे, सभागृहातील ६८ पैकी ३४ जागा महिलांसाठी राखीव असतील. यामुळे राजकीय समीकरणे आणखी रंगतदार होणार आहेत.

दिवाळीनंतर निवडणुकीचा बिगुल!
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल दिवाळीनंतर वाजण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यातच जि.प. अध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गासाठी जाहीर झाले असून, १५ पंचायत समित्यांचेही आरक्षण निश्चित झाले आहे. इच्छुक उमेदवारांनी तयारीला वेग दिला असून, अनेकांनी नव्या नियमावलीनुसार आपापले अंदाज बांधले आहेत. पण हे अंदाज खरे ठरतात की फसतात, हे आजच्या सोडतीनंतर स्पष्ट होईल.

जुन्या खेळाडूंना संधी की नव्या मोहऱ्यांचा उदय?
नव्या आरक्षण नियमावलीने जुन्या सदस्यांना पुन्हा निवडणूक लढवण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वीच्या आरक्षण पद्धतीत काही तालुक्यांमध्ये जागा राखीव होण्याची शक्यता होती, परंतु नव्या नियमांमुळे माजी सदस्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यामुळे जुन्या चेहऱ्यांना पुन्हा संधी मिळेल की नव्या मोहऱ्या बाजी मारतील, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

हरकतींची संधी अन् अंतिम आरक्षणाची प्रतीक्षा
आरक्षण जाहीर झाल्यानंतर १४ ते १७ ऑक्टोबरदरम्यान हरकती नोंदवण्याची मुदत आहे. हरकतींवरील गोषवारा २७ ऑक्टोबरला सादर होईल, तर ३१ ऑक्टोबरला प्रारूप आरक्षण अंतिम होईल. त्यानंतर ३ नोव्हेंबरला राजपत्र प्रसिद्ध होणार आहे. या प्रक्रियेनंतर निवडणुकीच्या तारखांचा मार्ग मोकळा होईल.

जिल्हा परिषद की नगरपालिका: कोणती निवडणूक आधी?
सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे निवडणूक कार्यक्रमावर परिणाम झाला आहे. आता ग्रामीण भागातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आधी होणार की नागरी क्षेत्रातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका आधी, हे दिवाळीनंतर स्पष्ट होईल. राज्य निवडणूक आयोग प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांचे मत जाणून घेऊन याबाबत निर्णय घेणार आहे.

ताज्या बातम्या