जळगाव: जि.प. निवडणुकीत आरक्षण सोडतीने मातब्बरांना धक्का !
जळगाव: जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबर रोजी ६८ गटांच्या आरक्षण सोडतीची प्रक्रिया जिल्हा नियोजन भवनात पार पडली, तर पंचायत समित्यांच्या गणांचे आरक्षण तालुकास्तरावर जाहीर झाले. या सोडतीत अनेक दिग्गजांना फटका बसला असून, काही माजी पदाधिकाऱ्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.
माजी पदाधिकाऱ्यांचे गट राखीव, काहींना संधी
माजी अध्यक्षा रंजना पाटील यांचा गट राखीव झाला असला तरी माजी उपाध्यक्षा उज्वला पाटील यांना कासोदा गट ओबीसी महिलांसाठी राखीव झाल्याने पुन्हा निवडणूक लढण्याची संधी आहे. मात्र, माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील आणि नंदकिशोर महाजन यांचे कुसुंबा व ऐनपुर गट सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांची अडचण वाढली आहे. माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले यांचा तळई गट खुला राहिल्याने त्यांना निवडणूक लढवता येणार आहे. याच गटातून शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख वासुदेव पाटील यांचाही दावा आहे.
मंत्री पुत्रांची पंचाईत
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रताप पाटील यांचा बांभोरी गट सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांना नवीन मतदारसंघ शोधावा लागणार आहे. साळवा गटातून चंद्रशेखर अत्तरदे यांना संधी आहे, तर शिरसोली गटातून नंदू पाटील आणि हभप जळकेकर महाराज यांना संधी आहे. मात्र, म्हसावद गट नामाप्रसाठी राखीव झाल्याने पवन सोनवणे यांची अडचण झाली आहे. त्यांच्या पत्नी कानळदा गटातून निवडणूक लढवू शकतात. शिक्षण सभापती रविंद्र पाटील यांचा गट खुला राहिल्याने त्यांना पुन्हा संधी आहे, तर माजी सभापती पोपट तात्या भोळे यांचा पातोंडा गट आणि महिला व बाल कल्याण सभापती ज्योती पाटील यांचा गट अनु. जमाती महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे. आरोग्य सभापती दिलीप पाटील यांचा अडावद गटही राखीव झाला आहे.
रावेर, जामनेरमध्ये ‘महिलाराज’
रावेर तालुक्यातील सहा गटांपैकी तीन गट अनु. जाती महिलांसाठी, दोन गट अनु. जमाती महिलांसाठी आणि एकमेव ऐनपुर गट सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाला आहे. यामुळे रावेरमध्ये यंदा ‘महिलाराज’ दिसणार आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातील रावेर, यावल, चोपडा, भुसावळ, आणि मुक्ताईनगर तालुक्यांत अनु. जाती आणि जमातींच्या जागा जास्त राखीव झाल्याने दिग्गजांना मोठा फटका बसला आहे. जामनेर तालुक्यात एका जागेव्यतिरिक्त सर्व गट महिला आणि नामाप्रसाठी राखीव झाल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. मात्र, भडगाव, पाचोरा, चाळीसगाव, पारोळा आणि एरंडोल तालुक्यांत आरक्षणाचा फटका तुलनेने कमी आहे.
आरक्षण सोडतीची प्रक्रिया
जिल्हाधिकारी रोहन घुगे, उपजिल्हाधिकारी विजय कुमार ढगे, तहसीलदार विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत पार पडली. लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या. या सोडतीमुळे अनेक दिग्गजांची गणिते बिघडली असून, काहींना नव्याने रणनीती आखावी लागणार आहे.
गटांचे आरक्षण
चोपडा: विरवाडे (अनु. जमाती), धानोरा प्र.अ. (अनु. जमाती), अडावद (अनु. जमाती), लासुर (सर्वसाधारण), चहार्डी (अनु. जमाती महिला), हिंगोणे (अनु. जमाती), घोडगाव (अनु. जमाती महिला)
यावल: न्हावी प्र. (सर्वसाधारण), किनगाव बु. (अनु. जमाती), साकळी (सर्वसाधारण), भालोद (नामाप्र), साकळी (सर्वसाधारण)
रावेर: केहाळे बु. (अनु. जमाती), वाघोड (अनु. जाती महिला), निंभोरा यु. (अनु. जाती महिला), चिनावल (अनु. जमाती महिला), वाघोदा बु. (अनु. जाती महिला), ऐनपुर (सर्वसाधारण महिला)
मुक्ताईनगर: अंतुर्ली (अनु. जाती), कुड़े (अनु. जमाती महिला), हरताळे (सर्वसाधारण)
बोदवड: नाडगाव (नामाप्र), शेलवड (सर्वसाधारण महिला)
भुसावळ: कंडारी (अनु. जाती), निंभोरा बु. (अनु. जाती), कुहे प्र.न. (सर्वसाधारण महिला)
जळगाव: कानळदा (अनु. जमाती महिला), आसोदा (अनु. जमाती महिला), कुसुंबे खुर्द (सर्वसाधारण महिला), शिरसोली (सर्वसाधारण), म्हसावद (नामाप्र)
धरणगाव: साळवा (सर्वसाधारण), पिंप्री खुर्द (अनु. जमाती), पाळधी खुर्द (सर्वसाधारण महिला)
अमळनेर: कळमसरे (सर्वसाधारण), पातोंडा (नामाप्र महिला), दहिवद (नामाप्र महिला), मांडळ (सर्वसाधारण महिला), जानवे (सर्वसाधारण)
पारोळा: शिरसोदे (नामाप्र), म्हसवे (नामाप्र), शिरसमणी (सर्वसाधारण), तामसवाडी (सर्वसाधारण महिला)
एरंडोल: विखरण (नामाप्र), तळई (सर्वसाधारण), कासोदा (नामाप्र महिला)
जामनेर: नेरी दिगर (नामाप्र), बेटावद (सर्वसाधारण महिला), शहापुर (नामाप्र महिला), पाळधी (नामाप्र महिला), लिहे (नामाप्र महिला), पहुर पेठ (सर्वसाधारण महिला), तोंडापुर (सर्वसाधारण महिला)
पाचोरा: बांबरुड प्र.बो. (सर्वसाधारण), लोहारा (सर्वसाधारण महिला), पिंपळगाव बु. (नामाप्र महिला), लोहटार (सर्वसाधारण), नगरदेवळा (सर्वसाधारण)
भडगाव: गिरड (सर्वसाधारण), गुढे (सर्वसाधारण), कजगाव (सर्वसाधारण महिला)
चाळीसगाव: बहाळ (सर्वसाधारण), पातोंडा (नामाप्र महिला), राजंणगाव (सर्वसाधारण महिला), टाकळी प्र.चा. (नामाप्र), मेहुणबारे (नामाप्र महिला), सायगाव (सर्वसाधारण), उंबरखेड (सर्वसाधारण महिला), घोडेगाव (नामाप्र)
