जळगावमध्ये माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या ‘मुक्ताई’ बंगल्यात घरफोडी; लाखोंचा मुद्देमाल लंपास !जळगाव | विशेष प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या जळगाव शहरातील ‘मुक्ताई’ निवासस्थानात चोरट्यांनी कुलूप तोडून प्रवेश करत सोन्या-चांदीचे दागिने, भेटवस्तू व रोख रक्कम असा सुमारे लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या घरफोडीमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांसमोर चोरट्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

नुकतीच खडसे कुटुंबीयांच्या मुक्ताईनगर येथील पेट्रोल पंपावर दरोडा पडल्याची घटना ताजी असताना ही घटना घडली आहे.
शहरातील शिवरामनगर भागातील ‘मुक्ताई’ बंगला दिवाळी सुट्टीमुळे बंद होता. एकनाथराव खडसे हे मुक्ताईनगर येथे वास्तव्यास असल्याने बंगला रिकामा होता. मंगळवारी सकाळी त्यांचे सहकारी नेहमीप्रमाणे बंगल्यावर आले असता मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले आढळले. आत प्रवेश करता घरातील सर्व कपाटे, ड्रॉर्स उघडे व सामान विखुरलेले दिसले, ज्यावरून चोरीची घटना स्पष्ट झाली.
याबाबत त्वरित पोलिसांना माहिती दिली. वरिष्ठ पोलीस अधिकारी, गुन्हे शोध पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा सुरू असून, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे. पोलिसांनी विशेष पथके नेमून तपास तीव्र केला आहे.
चोरीला गेलेला मुद्देमाल:
सोन्याचे दागिने: गहू पोत (२० ग्रॅम), कानातील टॉप्स (४ ग्रॅम व ३ ग्रॅम), डायमंड कर्णफूल (४ ग्रॅम), दोन अंगठ्या (३ व ४ ग्रॅम – एकूण ७ ग्रॅम), गोफ (१० ग्रॅम), पहिल्या मजल्यावरील बेडरूममधून चार अंगठ्या (प्रत्येकी ५ ग्रॅम – एकूण २० ग्रॅम).
रोख रक्कम: ३५ हजार रुपये. एक किलो वजनाची गदा, एक किलो वजनाचा त्रिशूल, सहा ग्लास (एक किलो २०० ग्रॅम), दोन किलो वजनाची तलवार, दोन मोठे रथ (प्रत्येकी २-२.५ किलो), चांदीचे ब्रेसलेट, हत्ती आदी. एकूण मुद्देमालाची किंमत लाखो रुपये असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
माजी मंत्र्यांच्या निवासस्थानी घडलेल्या या घटनेने शहरातील कायदा-सुव्यवस्था व सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
