बीजिंग वृत्तसंस्था: जगातील सर्वाधिक वेगवान बुलेट ट्रेन चीनने बनवली आहे. ही रेल्वे ताशी ४५० किमी वेगाने धावू शकते. रविवारी या रेल्वेचे मॉडेल जगाला दाखवण्यात आले.
सध्या चीनमध्ये ताशी ३५० किमी वेगाने धावणारी रेल्वे आहे. सीआर ४०० असे या रेल्वेचे नाव आहे. नव्या रेल्वेचे सीआर ४५० असे नामकरण करण्यात आले आहे. या रेल्वेने चाचणीत वेग, विजेचा वापर, अंतर्गत आवाज आणि ब्रेकिंग यंत्रणा या निर्देशांकांवर नवी आंतरराष्ट्रीय मापदंड स्थापन करणारी कामगिरी केल्याचे चीनच्या रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. जगातील ही वेगवान रेल्वे अजून काही चाचण्यांनंतर लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. यामुळे प्रवासाचा वेळ
वाचेल, कनेक्टिव्हिटी सुधारेल, असे सांगण्यात येत आहे. चीनमध्ये सध्या हाय स्पीड रेल्वेचे ४७ हजार किमीचे मार्ग आहेत. देशातील प्रमुख शहरांना या हायस्पीड रेल्वे नेटवर्कने जोडण्यात आले आहे. हायस्पीड रेल्वे नेटवर्क तोट्यात असले तरी देशाची अर्थव्यवस्था आणि सामाजिक व औद्योगिक विकास
यांमध्ये या नेटवर्कची मोठी भूमिका असल्याचे चिनी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. चीनमध्ये सध्या बीजिंग शांघाय मार्गावरील बुलेट ट्रेन सेवाच फायद्यात आहे. उर्वरित शहरांदरम्यानची बुलेट ट्रेन सेवा तोट्यात आहे. अलीकडे चीनने धायलंड, इंडोनेशियाला बुलेट ट्रेनची निर्यात केली आहे.