किडनीची लक्षणे दिसल्यास त्वरित उपचार करा – डॉ. अभय जोशी
जळगाव (प्रतिनिधी) – किडनी हा शरीरातील अत्यंत महत्वाचा अवयव आहे, आणि किडनी आजाराची प्रारंभिक लक्षणे दिसल्यावर त्वरित उपचार सुरु केल्यास किडनी वाचवता येऊ शकते, असे प्रतिपादन जळगाव शहरातील प्रसिध्द किडनी तज्ज्ञ डॉ. अभय जोशी यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आरोग्य केंद्राच्या वतीने जागतिक किडनी दिनानिमित्त “किडनी विषयक सुरक्षा व जनजागृती” या विषयावर डॉ. जोशी यांचे व्याख्यान विद्यापीठाच्या अधिसभागृहात १३ मार्च रोजी आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरु प्रा. एस.टी.इंगळे व कुलसचिव डॉ. विनोद पाटील हे उपस्थित होते. डॉ. जोशी यांनी आपल्या भाषणात किडनीच्या लक्षणांची महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “वेगवेगळ्या लक्षणांवर त्वरित लक्ष दिल्यास किडनी वाचवता येऊ शकते. रक्तदाब, साखर व सांध्यांमधील वेदना यावर नियमित लक्ष ठेवणे आवश्यक आहे,” असे त्यांनी सांगितले.
डॉ. जोशी पुढे म्हणाले, “मधुमेहामुळे किडनी आजार होण्याचे प्रमाण ४४% आहे, आणि त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. किडनी आजाराची काही प्रमुख लक्षणे आहेत ज्यात ब्लड प्रेशर वाढलेले असणे, सांध्यांमध्ये दुखणे, लघवीत फेस येणे आणि रात्री वारंवार लघवीला जाणे यांचा समावेश आहे.”
त्यांनी सर्वांना किडनीच्या आरोग्यासाठी नियमित व्यायाम, पुरेसे पाणी पिणे आणि संतुलित आहार घेण्याचा सल्ला दिला. तसेच, वेदनाशमक गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणं टाळावं, असे त्यांनी सांगितले.
कुलगुरु प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी अध्यक्षीय समारोप करतांना सांगितले की, “आपल्या जीवनशैलीत, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये संतुलन राखणे आवश्यक आहे. किडनी आजाराची प्राथमिक लक्षणे ओळखून वेळेवर उपचार घेणं अत्यंत महत्त्वाचे आहे,” असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे नियोजन आरोग्य केंद्राच्या डॉ. रोशनी पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. या कार्यक्रमाला विद्यापीठ प्रशाळेचे संचालक, शिक्षक, शिक्षकेतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुभाष पवार यांनी केले.