धरणगाव तालुक्यातील पिंपळे फाट्या जवळील घटना
धरणगाव( प्रतिनिधी) :-रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला राज्य परिवहन महामंडळाच्या बसने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये एक जण ठार तर 21 प्रवासी जखमी झाल्याची घटना आज शनिवार 14 रोजी सकाळी धरणगाव चोपडा रोडवर असलेल्या पिंपळे फाट्याजवळ घडली. जखमींना नागरिकांनी तातडीने उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान शुक्रवारी देखील एसटी बस खांबाला धडकून झालेल्या अपघातात 28 प्रवासी जखमी झाल्याची घटना ताजी असताना हा अपघात सलग दुसऱ्या दिवशी झाला आहे.
धरणगाव चोपडा मार्गे जाणारी जळगाव शिरपूर बस क्रमांक (एमएच १४ बीटी ३९१०)नेपिंपळे गावाजवळील फाट्याजवळ शनिवारी १४ डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास रस्त्यावर उभे असलेल्या एका ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९ ईजी ३९५२) ला जोरदार धडक दिल्याची घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की, बसचा पुढील भाग अक्षरशः कापला गेला यावरून अपघाताची भीषणता लक्षात येते. यामध्ये एक प्रवासी जागी ठार तर 21 प्रवासी जखमी झाले असून बस चालक यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांची नावे पुढीलप्रमाणे
जाकीर शब्बीर खाटीक (वय -३५, रा. पिंप्री), शब्बीर रहे मुल्ला खाटीक (वय-६५, पिंप्री), गंगाराम आनंदा बाविस्कर (वय -६८, पिंप्राळा), प्रमिला ईश्वर सोनवणे (वय-५०, जळगाव), अनिश हनीफ शेख (वय-३८, चोपडा), सागर विठ्ठल पाटील (वय -२८, रोटवद), भगवान सुपडू पाटील (वय-७५, रा. पिंपळे सिम), सुनील रामसिंग अलकारी (वय -५८, जळगाव), अनिता सुनील अलकारी (वय-५२, जळगाव), नंदा वसंत बाविस्कर (वय-३३, साळवा) आणि व्ही.व्ही. इंगोले (वय-४०, जळगाव) , जयश्री गणेश मराठे वय-४५, शरद बिलाडिया पारधी (वय-४०, नंदुरबार), विमल रमेश मराठे (वय-६५, नळयात), रमेश सोनू मराठी वय-७५, कमलबाई काशिनाथ मराठे (वय-७५), वरुड प्रवीण भगवान कुंभार (वय-२४, गोरगाव), ज्योती योगेश पाटील (वय-३८, साळवा), सुषमा कपिल सिंग बयास (वय -३६, धरणगाव), मेघना कपिलसिंग बयास (वय -७, धरणगाव), योगेश दिगंबर पाटील (वय-३६, धरणगाव), असे प्रवासी जखमी झालेले आहेत.
जखमींना धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल :
दरम्यान या भीषण अपघातात जखमी झालेल्या २१ प्रवाशांना तातडीने धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर धरणगाव पोलीस ठाण्याची पोलीस निरीक्षक पवन दिसले यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर त्यांनी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली. याबाबत पोलिसात अपघाताची नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते