Monday, July 7, 2025
HomeBlogइलॉन मस्क यांचा नवीन राजकीय पक्ष : 'अमेरिका पार्टी' द्वारे दोन पक्षीय...

इलॉन मस्क यांचा नवीन राजकीय पक्ष : ‘अमेरिका पार्टी’ द्वारे दोन पक्षीय व्यवस्थेला थेट आव्हान

इलॉन मस्क यांचा नवीन राजकीय पक्ष : ‘अमेरिका पार्टी’ द्वारे दोन पक्षीय व्यवस्थेला थेट आव्हान

न्यूयॉर्क, दि. ६: अमेरिकेतील नामवंत उद्योजक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्व इलॉन मस्क यांनी ‘अमेरिका पार्टी’ या नावाने नवीन राजकीय पक्ष स्थापन केल्याची घोषणा केली आहे. सध्याच्या रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट या दोन प्रमुख पक्षांच्या वर्चस्वामुळे लोकशाहीचा गळा घोटला जात असून सामान्य नागरिकांचे स्वातंत्र्य धोक्यात आल्याचे मस्क यांनी स्पष्ट केले आहे.

आपल्या समाजमाध्यम ‘एक्स’ वरील पोस्टमध्ये मस्क यांनी सांगितले की, सध्याची दोन पक्षीय व्यवस्था अपयशी ठरली असून अपव्यय आणि भ्रष्टाचारामुळे देश आर्थिक संकटात सापडला आहे. आपण ज्या लोकशाहीत जगत आहोत, ती केवळ नावापुरती असून प्रत्यक्षात एकाधिकारशाहीच्या स्वरुपात रूपांतरित झाली आहे, असे त्यांनी नमूद केले.

ट्रम्प यांच्याशी मतभेदांची पार्श्वभूमी

कधीकाळी डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय आणि त्यांच्या निवडणुकीसाठी मोठे देणगीदार असलेल्या मस्क यांचे ट्रम्प यांच्याशी कर आणि खर्च कपातीच्या धोरणावरून गंभीर मतभेद झाले होते. ‘बिग ब्युटिफुल बिल’ या विधेयकामुळे अमेरिकेच्या आर्थिक तुटीमध्ये प्रचंड वाढ होईल, अशी टीका मस्क यांनी केली होती. ट्रम्प प्रशासनाने मात्र हे विधेयक मंजूर करून कायद्यात रूपांतर केले. यानंतर मस्क आणि ट्रम्प यांच्यातील दूरावा अधिकच वाढला.

नवीन पक्षाची योजना आणि भविष्यातील दिशा

मस्क यांनी आपल्या पक्षाचे नाव ‘अमेरिका पार्टी’ असे जाहीर केले आहे. त्यांनी सांगितले की, हा पक्ष केवळ सत्तेचा पर्याय नाही, तर अमेरिकन लोकांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य आणि उत्तरदायित्वाची राजकीय व्यवस्था देण्याचा प्रयत्न करेल. आगामी मध्यावधी निवडणुकीपासून पक्ष सक्रिय होणार असून प्रारंभी काही ठराविक जागांवरच उमेदवार उभे केले जातील.

नोंदणीबाबत सस्पेंस कायम

सध्या तरी मस्क यांच्या पक्षाची अधिकृत नोंदणी राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडे झालेली नाही. पक्ष म्हणून मान्यता मिळविण्यासाठी अधिकृत प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. मस्क यांनी आपल्या पक्षाची रचना, धोरण आणि प्रमुख नेत्यांविषयी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

तिसऱ्या पक्षाचा ऐतिहासिक संघर्ष

अमेरिकेतील राजकीय इतिहासात तिसऱ्या पक्षांची चळवळ पूर्वीही झाली होती, मात्र त्यांना फारसा यश मिळालेला नाही. तरीही मस्क यांच्या व्यक्तिमत्वामुळे आणि लोकप्रियतेमुळे ‘अमेरिका पार्टी’ ला सुरुवातीला व्यापक चर्चेचा फायदा मिळू शकतो, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

ताज्या बातम्या