आर.एल. ग्रुपच्या कर्ज खात्यावरून फसवणुकीचा ठपका हटवला – ईश्वरलाल जैन
जळगाव प्रतिनिधी
स्टेट बँक ऑफ इंडियाकडून (SBI) घेतलेल्या थकीत कर्ज प्रकरणात राजमल लखिचंद (आर.एल.) समूहाच्या कर्ज खात्यावर लावलेला फसवणुकीचा ठपका बँकेने हटवला आहे. यासंबंधी बँकेचे अधिकृत पत्र प्राप्त झाले असून, या निर्णयामुळे न्यायालयीन लढाईत मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास आर.एल. समूहाचे संचालक ईश्वरलाल जैन यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यावेळी संचालक मनिष जैन देखील उपस्थित होते.
बँकेने एकतर्फी घेतला होता निर्णय
आर.एल. समूहाने स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ५२५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, बँकेने त्यांच्या खात्याला “फ्रॉड” घोषित करून फसवणुकीचा ठपका ठेवला होता. जैन यांच्या मते, बँकेने गटाला बाजू मांडण्याची संधी न देता ही कारवाई केली होती. फॉरेन्सिक ऑडिटचा अहवालही न देता ईडी आणि सीबीआयच्या चौकशीला तोंड द्यावे लागले.
न्यायालयीन लढाईत मोठा दिलासा
या निर्णयाविरोधात आर.एल. समूहाने उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. मात्र, आता स्टेट बँकेनेच त्यांच्या खात्यावरून फसवणुकीचा ठपका काढल्याने न्यायालयीन केसही त्यांच्या बाजूने लागेल, असा विश्वास ईश्वरलाल जैन यांनी व्यक्त केला.
सत्याचा विजय – मनिष जैन
स्टेट बँकेच्या निर्णयामुळे आर.एल. समूहाला मोठा दिलासा मिळाला आहे. “आमच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप आता मुक्त होतील. सत्याचा विजय होईल. जरी या प्रक्रियेला वेळ लागला तरी शेवटी निकाल आमच्या बाजूने लागेल,” असे संचालक मनिष जैन यांनी सांगितले.