हिंजवडीतील बस आगीचे उलगडले भयानक सत्य ; चालकच निघाला शैतान !
नाहक गेला चार निष्पाप व्यक्तींचा बळी ; पुणे हादरले !
पुणे वृत्तसंस्था
हिंजवडी येथे आयटी कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसला अचानक लागलेल्या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू आणि सहाजण गंभीर जखमी झाले होते. सुरुवातीला हा अपघात असल्याचे वाटत असतानाच पोलिसांच्या तपासात धक्कादायक सत्य उघडकीस आले आहे. ही आग कोणत्याही तांत्रिक बिघाडामुळे नव्हे, तर खुद्द चालकाने हेतुपुरस्सर लावल्याचे निष्पन्न झाले आहे!
या प्रकरणी पोलिसांनी जनार्दन हंबर्डीकर (वय ५७, रा. वारजे) या चालकाला अटक केली आहे. त्याने पूर्वनियोजित कट रचून रासायनिक स्फोट घडवून ही बस जाळल्याचा उलगडा झाला आहे.
कसा रचला गेला हा कट?
चालक हंबर्डीकर याचा कंपनीतील कर्मचाऱ्यांशी सातत्याने वाद होत होता. याशिवाय दिवाळी बोनस न मिळाल्याचा आणि वेतन कपातीचा त्याला राग होता. याच कारणावरून त्याने सूड उगवण्यासाठी ही भयानक योजना आखली.
घटनेच्या आदल्या दिवशी त्याने ‘बेंझिन’ केमिकल गाडीत आणून ठेवले.वारजे येथून काडीपेटी विकत घेतली.बसच्या सीटखाली ज्वलनशील चिंध्याही ठेवल्या.हिंजवडीजवळ पोहोचल्यावर काडी पेटवली आणि बसमधून उडी मारली.केमिकलमुळे आगीचा भीषण भडका उडाला, ज्यात चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आणि सहाजण गंभीर जखमी झाले.
या निर्दोषांचा गेला नाहक बळी
या आगीत सुभाष भोसले (४२, वारजे), शंकर शिंदे (५८, नऱ्हे), गुरुदास लोकरे (४०, कोथरूड), राजू चव्हाण (४०, वडगाव धायरी) या चार जणांचा जागीच मृत्यू झाला.
तर संदीप शिंदे, विश्वनाथ जोरी, विश्वास खानविलकर, प्रवीण निकम, चंद्रकांत मलजी हे सहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
संपूर्ण पुणे हादरले!
या घटनेमुळे हिंजवडी आणि संपूर्ण पुणे हादरले आहे. एक अपघात म्हणून पाहिले जाणारे हे प्रकरण प्रत्यक्षात पूर्वनियोजित हत्याकांड असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
हा रागाचा विस्फोट होता की अजून काही गूढ? या हत्याकांडामागे आणखी कोणी आहे का?याचा शोध घेतला जात आहे.