Sunday, June 15, 2025
Homeक्राईमसुट्टीवर आलेल्या जवानाचा विहिरीत बुडून मृत्यू 

सुट्टीवर आलेल्या जवानाचा विहिरीत बुडून मृत्यू 

सुट्टीवर आलेल्या जवानाचा विहिरीत बुडून मृत्यू 

बांबरुड गावात शोककळा

पाचोरा (प्रतिनिधी): सुट्टीवर घरी आलेल्या जवानाचा विहिरीत पाय घसरून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना पाचोरा तालुक्यातील बांबरुड खुर्द येथे गुरुवारी (दि. २४ एप्रिल) सकाळी उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली असून, जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मृत जवानाचे नाव रवींद्र पंडितराव पाटील (वय ३८, रा. बांबरुड खुर्द, ता. पाचोरा) असे आहे. ते आसाम रायफल्स, शिलॉंग येथे सेवेत होते. फेब्रुवारी २०१० पासून त्यांनी भारतीय सेनेत आपली जबाबदारी पार पाडली होती. काही दिवसांपूर्वीच ते सुट्टीवर आपल्या गावी आले होते.

गुरुवारी सकाळी ९ वाजता ते शेतात फेरफटका मारण्याच्या उद्देशाने गेले होते. मात्र, यावेळी विहिरीजवळ पाय घसरून ते थेट पाण्यात पडले आणि बुडून त्यांचा मृत्यू झाला, असा प्राथमिक अंदाज आहे. चुलत भाऊ गोपाल पाटील सकाळी ११ वाजता शेतात गेले असता, विहिरीजवळ चप्पल आणि रुमाल दिसून आले. त्यावरून रवींद्र पाटील विहिरीत पडले असावेत, अशी शंका बळावली. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

विहिरीतील पाण्यात शोध घेतल्यानंतर हुसेन शेख यांच्या मदतीने जवानाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या क्षणी नातेवाईकांचा आक्रोश हृदयद्रावक होता. मृतदेह तातडीने भडगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज जाधव यांनी तपासून रवींद्र पाटील यांना मृत घोषित केले. रुग्णालय परिसरातही मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती.

मृत जवानाच्या पश्चात आई, पत्नी, एक भाऊ, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. या अपघाती निधनामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. जवानावर सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

ताज्या बातम्या