Friday, June 13, 2025
HomeBlogमध्यप्रदेशातील कुख्यात सोनसाखळी चोर जेरबंद

मध्यप्रदेशातील कुख्यात सोनसाखळी चोर जेरबंद

मध्यप्रदेशातील कुख्यात सोनसाखळी चोर जेरबंद

जळगाव (प्रतिनिधी) पत्नीच्या बाळंतपणासाठी जळगावात आलेल्या अट्टल गुन्हेगाराने शहरात सोनसाखळी चोरी करून फरार झाल्यानंतर, एलसीबीच्या पथकाने १५ दिवस शर्थीचे प्रयत्न करत त्याला अखेर अटक केली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली.

तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीचा वापर

जळगाव शहरात अलिकडच्या काळात झालेल्या सोनसाखळी चोरीच्या घटनांमुळे पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवले होते. एलसीबीच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज व गुप्त माहितीच्या आधारे माधव श्रावण बोराडे (रा. इंदोर, मध्यप्रदेश) याचे नाव शोधून काढले.

इंदोरचा रहिवासी माधव बोराडे हा स्थानिक गुन्हेगार असून, तो पत्नीच्या बाळंतपणासाठी जळगावात येऊन सोनसाखळी चोरी करत होता. पत्नी रुग्णालयात असताना तो शहरात फिरून चोरी करत असे.

इंदोरहून परत जळगावात; अखेर पोलिसांच्या जाळ्यात

एलसीबीच्या पथकाने इंदोर येथे सापळा रचला असता माधवने तिथून पलायन केले. मात्र, पुन्हा जळगावात आल्याची माहिती मिळताच दुसऱ्या पथकाने ३-४ तासांचा पाठलाग करून त्याला जेरबंद केले. माधवने दोन सोनसाखळी चोरीची कबुली दिली असून त्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.

टीम एलसीबीचे उल्लेखनीय योगदान

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पोउनि शरद बागल, स.फौ. संजय हिवरकर, विजयसिंग पाटील, अतुल वंजारी, राजेश मेढे, विजय पाटील, हरीलाल पाटील व अक्रम शेख यांनी केली.

ताज्या बातम्या