Friday, June 13, 2025
Homeक्राईमभुसावळ : कुख्यात गुन्हेगाराचा निर्घृण खून, मृतदेह पुरल्याने खळबळ

भुसावळ : कुख्यात गुन्हेगाराचा निर्घृण खून, मृतदेह पुरल्याने खळबळ

भुसावळ : कुख्यात गुन्हेगाराचा निर्घृण खून, मृतदेह पुरल्याने खळबळ

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील कुख्यात गुन्हेगार मुकेश भालेराव याची निर्घृण हत्या करून त्याचा मृतदेह पुरून टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत.

बेपत्ता होण्यापासून हत्या उघडकीस येईपर्यंत…

मुकेश प्रकाश भालेराव (वय ३१, रा. टेक्निकल हायस्कूल मागे, भुसावळ) याच्यावर खुनाचा प्रयत्न, लूट, मारहाण, धमकी आणि खंडणीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. कायद्याच्या कचाट्यात अडकल्याने प्रशासनाने त्याला काही काळ नाशिक येथे स्थानबद्ध केले होते. मात्र, नंतर तो पुन्हा भुसावळमध्ये वास्तव्यास होता.

गेल्या आठवडाभरापासून बेपत्ता असलेल्या मुकेशला काही तरुण घरातून घेऊन गेले होते. त्याचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. अखेर, शुक्रवारी सकाळी त्याच्या पत्नीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, तेव्हा पोलिसांनी शोधमोहीम वेगवान केली.

तापी नदीच्या किनारी गाडलेला मृतदेह सापडला

सायंकाळी सातच्या सुमारास पोलिसांना तापी नदीच्या किनारी खोलवट भागात एक मृतदेह पुरलेला असल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

हत्या पूर्ववैमनस्यातून?

या घटनेने शहरात भीतीचे वातावरण पसरले असून, हा खून पूर्ववैमनस्यातून झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भुसावळ शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, संशयित आरोपींच्या शोधासाठी तपास गतीमान करण्यात आला आहे.

 

ताज्या बातम्या