Sunday, June 15, 2025
Homeक्राईमपहलगाम दहशतवादी हल्ला: २६ निरपराधांचे बळी

पहलगाम दहशतवादी हल्ला: २६ निरपराधांचे बळी

पहलगाम दहशतवादी हल्ला: २६ निरपराधांचे बळी

संशयितांची रेखाचित्रे जाहीर ; PM मोदींचा तातडीने हस्तक्षेप

श्रीनगर,वृत्तसंस्था – जम्मू आणि काश्मीरमधील शांततेच्या ओळखीच्या पहलगाम खोऱ्यात २२ एप्रिल रोजी घडलेल्या दहशतवादी हल्ल्याने देश हळहळला आहे. या भ्याड हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांना जीव गमवावा लागला, तर २० हून अधिक जण जखमी झाले आहेत. हल्ल्याची जबाबदारी ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (TRF) या लष्कर-ए-तैयबा समर्थित दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे.

संशयितांची रेखाचित्रे जाहीर, शोध मोहीम वेगात

हल्ल्यानंतर लगेच राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि सुरक्षा दलांनी संयुक्त मोहीम राबवून संशयित दहशतवाद्यांची तीन रेखाचित्रे जाहीर केली आहेत. आसिफ फुजी, सुलेमान शाह आणि अबू तल्हा अशी या संशयितांची नावे असून, जखमी आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या वर्णनावरून रेखाचित्रे तयार करण्यात आली आहेत.

रेखाचित्रांचा स्थानिक परिसरात मोठ्या प्रमाणावर प्रचार केला जात असून, संशयितांचा ठावठिकाणा लावण्यासाठी सुरक्षा दल तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरवत आहेत.

द रेझिस्टन्स फ्रंट (TRF)

TRF ही संघटना २०१९ मध्ये कलम ३७० रद्द झाल्यानंतर उदयास आली. सुरुवातीला ऑनलाइन सक्रिय असलेली ही संघटना आता सशस्त्र दहशतवादात सहभागी झाली आहे. तहरीक-ए-मिल्लत इस्लामिया आणि गझनवी हिंद यांसारख्या संघटनांतील अतिरेकी TRF मध्ये सामील झाल्याचे माहिती सूत्रांचे म्हणणे आहे.
पंतप्रधान मोदींची तातडीने कारवाई ; सौदी अरेबिया दौरा रद्द

हल्ल्याची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबिया दौरा तातडीने रद्द करून देशात परत येताच दिल्लीत आपत्कालीन बैठक घेतली. या उच्चस्तरीय बैठकीस राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि परराष्ट्र सचिव उपस्थित होते. बैठकीत हल्ल्याची पार्श्वभूमी, TRF चा वाढता प्रभाव, आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिसादाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

देशभरातून निषेधाची लाट

या अमानवी हल्ल्याचा देशभरातून तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. सामाजिक, धार्मिक, आणि राजकीय संघटनांनी एकत्र येत दहशतवादाच्या विरोधात उभे राहण्याचे आवाहन केले आहे.

ताज्या बातम्या