नराधम दत्तात्रय गाडेचा गुन्हेगारी इतिहास उघड
एकट्या महिलांना लक्ष्य करून करायचा लुटमार!
पुणे प्रतिनिधी
स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार करणारा आरोपी दत्तात्रय गाडे याच्या गुन्हेगारी इतिहासाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकट्या प्रवास करणाऱ्या महिलांना लक्ष्य करून लूटमार करण्याच्या घटना त्याच्या नावावर नोंद आहेत, अशी माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे.
महिलांना फसवून निर्जनस्थळी नेण्याचा प्रकार
दत्तात्रय रामदास गाडे (वय ३६) याच्याविरोधात शिरूर, शिक्रापूर आणि सुपा (अहिल्यानगर) पोलिस ठाण्यांत एकूण सहा गुन्हे दाखल असून, यातील बहुतांश तक्रारी महिलांनी केल्या आहेत. त्यापैकी एका प्रकरणात त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा देखील दाखल आहे.
दत्तात्रय गाडे हा बसस्थानक आणि गर्दीच्या ठिकाणी एकट्या महिलांना गाठायचा. बस चुकल्याचे सांगून किंवा अन्य कारण देऊन त्यांना आपल्या वाहनात बसवायचा. नंतर निर्जनस्थळी नेऊन त्यांच्यावर हल्ला करून पैसे आणि मौल्यवान वस्तू लुटायचा. महिलांना धमकी देऊन निर्जनस्थळी सोडून पळ काढणे, हा त्याचा ठरलेला प्रकार असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
२०१९ आणि २०२०मध्येही गुन्ह्यांची नोंद
गाडेविरोधात २०१९मध्ये सुपा, कोतवाली आणि शिरूर पोलिस ठाण्यांत प्रत्येकी एक गुन्हा दाखल झाला होता. २०२०मध्येही शिरूर आणि शिक्रापूर पोलिस ठाण्यांत त्याच्याविरोधात प्रत्येकी दोन गुन्हे दाखल आहेत. या सर्व घटनांमध्ये त्याने एकट्या महिलांना लक्ष्य करून त्यांची लूटमार केल्याचे आढळले आहे.
गाडेच्या गुन्हेगारी इतिहासामुळे महिलांची सुरक्षा धोक्यात असल्याची भीती व्यक्त केली जात असून, पोलिस त्याच्या मागील गुन्ह्यांची सखोल चौकशी करत आहेत.