धक्कादायक: झोपेत असलेल्या चिमुकलीला बिबट्याने अलगद उचलून लचके तोडून केले ठार
डांभुर्णी शिवारातील घटनेमुळे प्रचंड खळबळ ; वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी
यावल प्रतिनिधी : शेतात एक मेंढपाळ कुटुंब गाढ झोपेत असताना चोर पावलाने आलेल्या एका बिबट्याने अलगद दोन वर्षाच्या चिमुकलीला उचलून नेत तिची लचके तोडून तिला ठार केल्याची दुर्दैवी घटना यावल तालुक्यातील डांभुर्णी शिवारात उघडकीस आली असून या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातून व्यक्त होत आहे. रत्नाबाई असे या चिमुकलीचे नाव आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की डांभुर्णी शिवारामध्ये प्रभाकर चौधरी यांचे शेत असून त्यांच्या शेतामध्ये ठेलारी कुटुंबातील मेंढपाळ वास्तव्याला असून 17 रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास दोन वर्षीय रत्नाबाई ही तिची आई जिजाबाई तिच्या शेजारी झोपली असताना अचानक चोर पावलांनी आलेल्या बिबट्याने दोन वर्षीय चिमुकलीला उचलून नेत तिला ठार केले. कुटुंबीयांनी चिमुकलीचा शोध घेतला असता तिचा मृतदेह छिन्न विच्छिन्न अवस्थेमध्ये झाडाझुडपांमध्ये आढळून आला. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या घटनेची माहिती मिळतात रात्री एकच्या सुमारास वन अधिकारी विपुल पाटील, पश्चीम विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे व अन्य सहकाऱ्यांचे पथक हे घटनास्थळी दाखल झाले. डांभुर्णी येथील पोलीस पाटलांनी दिलेल्या माहितीनंतर यावल पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकूर व त्यांचे सहकारी देखील रात्रीच येथे दाखल झाले. असून पुढील तपास सुरू आहेत.
दरम्यान सध्या हंगामातील शेतीचे कामे सुरू असून शेतकऱ्यांमध्ये बिबट्याच्या वावर मुळे भीतीचे वातावरण असून यापूर्वी सुद्धा बिबट्याच्या हल्ले झाल्याच्या घटना घडल्या असून या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरत आहे.