देशात पुन्हा कोरोनाची लाट : रुग्णसंख्येत वाढ, तज्ज्ञांचा सतर्कतेचा इशारा
नवी दिल्ली (प्रतिनिधी) – देशात कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले असून, सध्याची लाट आरोग्य यंत्रणेसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. शनिवारी (१४ जून) प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, भारतात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ७,४०० वर पोहोचली आहे. मागील २४ तासांत २६९ नव्या रुग्णांची नोंद झाली असून ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासोबतच, यावर्षी कोविडमुळे मृतांचा आकडा ८७ वर गेला आहे.
मे महिन्याच्या मध्यापासून देशभरात संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत असून, ही सातत्याने होणारी वाढ नागरिकांसाठीही धोक्याची घंटा ठरत आहे. वाढत्या धोका लक्षात घेता, आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना मास्कचा वापर करण्याचा, सामाजिक अंतर पाळण्याचा, गर्दी टाळण्याचा आणि वारंवार हात धुण्याचा सल्ला दिला आहे. तसेच उच्च जोखमीच्या गटातील व्यक्तींनी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
लसीकरणाचे फायदे – गंभीर आजारांपासून संरक्षण
कोविड लसींबाबत अनेक अफवा आणि शंका उपस्थित होत असल्या तरी, तज्ज्ञांच्या मते लसीकरण हेच कोरोनापासून बचावाचे सर्वात प्रभावी शस्त्र आहे. अलीकडेच करण्यात आलेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, कोविड लसी केवळ संसर्गापासूनच नव्हे, तर इतर गंभीर स्थितींमध्येही मदत करतात.
मार्च २०२० ते मार्च २०२२ या कालावधीत रुग्णालयात दाखल झालेल्या ३,५०० रुग्णांच्या डेटावर आधारित अभ्यासातून असे समोर आले आहे की, लसीकरण झालेल्या रुग्णांमध्ये सीआरआरटी (CRRT – Continuous Renal Replacement Therapy) या मूत्रपिंड निकामी झाल्यावर आवश्यक ठरणाऱ्या उपचारांची गरज कमी होती. लसीकरण न झालेल्या मूत्रपिंडाच्या रुग्णांना गंभीर संक्रमण झाल्यास सीआरआरटीची गरज भासण्याची शक्यता १६% अधिक होती. तसेच, रुग्णालयातून डिस्चार्जनंतरही अशा रुग्णांमध्ये ही गरज सुमारे अडीच पट अधिक असल्याचे दिसून आले.
शास्त्रीय अभ्यासातून निष्कर्ष स्पष्ट
या अभ्यासाचे निष्कर्ष हे लसीकरणाच्या प्रभावीतेची पुष्टी करणारे असून, गंभीर आजार असलेल्या व्यक्तींनी लस घेणे किती आवश्यक आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या माहितीला बळी न पडता, आरोग्य यंत्रणांच्या सूचनांचे पालन करणे आणि लसीकरण करून घेणे हाच सुरक्षिततेचा योग्य मार्ग आहे, असे तज्ज्ञांचे स्पष्ट मत आहे.