तरुणाने उचलले टोकाचे पाऊल…!
जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी): जळगाव तालुक्यातील ममुराबाद गावात बुधवारी (दि. २३ एप्रिल) दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली. विनोद लक्ष्मण वाघ (वय २७, . ममुराबाद) या तरुणाने घरात कोणी नसताना छताला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दुपारी १:३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.विनोद आपली आई, तीन भाऊ आणि एका बहिणीसह ममुराबाद येथे राहत होता. कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीकामातून करणारा विनोद कुटुंबाचा आधारस्तंभ होता. बुधवारी सकाळी घरात कोणी नसल्याने त्याने आपल्या राहत्या घराच्या छताला दोरीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.कुटुंबीय घरी परतल्यानंतर त्यांनी विनोदला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांचा आक्रोश आणि शोकाकुल वातावरण पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.
.घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस याप्रकरणी सखोल तपास करीत आहेत.