ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर
मुंबई : भारतीय शिल्पकलेला जागतिक स्तरावर नवी ओळख देणारे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही घोषणा केली. २५ लाख रुपये, मानचिन्ह, मानपत्र आणि शाल असे या प्रतिष्ठित पुरस्काराचे स्वरूप असून, त्यांच्या अमूल्य कलासाधनेचा गौरव करण्यात आला आहे.
राम सुतार यांनी आजवर अनेक ऐतिहासिक आणि भव्य शिल्पकृती घडविल्या आहेत. गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ अर्थात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याच्या निर्मितीचे श्रेय त्यांना जाते. तसेच, कोकणात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या शिल्पनिर्मितीचे कामही त्यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत माहिती देताना सांगितले,
“महाराष्ट्र भूषण हा राज्य सरकारतर्फे दिला जाणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. यंदा १२ मार्च २०२५ रोजी झालेल्या निवड समितीच्या बैठकीत ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांच्या नावाला मान्यता देण्यात आली. शंभराव्या वर्षातही त्यांची कला अविरत सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमीवरील स्मारकातील भव्य पुतळाही ते साकारत आहेत. त्यांच्या योगदानाचा गौरव करणे, हा महाराष्ट्रासाठी अभिमानाचा विषय आहे.”
राम सुतार : एक द्रष्टा शिल्पकार
१९ फेब्रुवारी १९२५ रोजी महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील गोंडूर गावात एका साध्या कुटुंबात राम सुतार यांचा जन्म झाला. शिल्पकलेतील त्यांचे शिक्षण मुंबईच्या ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’मध्ये झाले. शासकीय सेवेत असताना त्यांनी अजिंठा-वेरुळ गुंफांच्या शिल्पसंग्रहाची जतन आणि दुरुस्ती केली. त्यानंतर, १९६० मध्ये त्यांनी स्वतःचा स्वतंत्र शिल्प स्टुडिओ सुरू केला.
राम सुतार यांनी अनेक थोर नेत्यांचे पुतळे साकारले आहेत. त्यामध्ये संसद भवन परिसरातील मौलाना आझाद (१८ फूट), इंदिरा गांधी (१७ फूट), राजीव गांधी (१२ फूट), गोविंद वल्लभ पंत (१० फूट) आणि बाबू जगजीवनराम (९ फूट) यांच्या शिल्पांचा समावेश आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या भव्य मूर्ती त्यांच्या कुशलतेचा सर्वोत्तम नमुना आहेत.
त्यांच्या शिल्पकृती भारतापुरते मर्यादित नाहीत. फ्रान्स, इटली, अर्जेंटिना, रशिया आणि इंग्लंडमध्येही त्यांच्या शिल्पकृती उभ्या आहेत.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सन्मान
राम सुतार यांना आजवर अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. २०१६ साली त्यांना केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून ‘टागोर पुरस्कार’ मिळाला, ज्यामध्ये एक कोटी रुपये, मानपत्र आणि पारंपरिक हस्तकला शिल्प देण्यात आले.
आता, ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने त्यांचा गौरव होणार असून, त्यांच्या अविस्मरणीय योगदानाचा सन्मान संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.