जळगावात सायबर पोलीस स्टेशनचे उद्घाटन; नागरिकांच्या सुरक्षेसाठी नवी सुविधा
जळगाव : जळगाव येथे सायबर पोलीस स्टेशनचे उद्घाटन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. या सोहळ्यास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल उपस्थित होते.
हे सायबर पोलीस स्टेशन सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि फसवणुकीच्या घटनांवर तात्काळ कारवाई करण्यासाठी २४ तास कार्यरत राहणार आहे. नागरिकांना सायबर फसवणुकीच्या बाबतीत तक्रार नोंदवण्यासाठी १९३० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्घाटनप्रसंगी सायबर सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचे स्वागत केले. डिजिटल युगात सायबर सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता असून, नागरिकांनी सतर्क राहून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे ते म्हणाले.