जळगावात दारू दुकानावर धाडसी चोरी : १० लाखांचा ऐवज लंपास
जळगाव, प्रतिनिधी – शहरात उन्हाळ्याच्या झळांसोबतच गुन्हेगारीनेही डोके वर काढले आहे. मंगळवारी रात्री जळगाव शहरात एकाच रात्रीत दोन चोरीच्या घटना घडल्या असून, ईच्छादेवी चौफुलीजवळील ‘अशोका लिकर गॅलरी’ या मद्यविक्री दुकानावर चोरट्यांनी मोठा डल्ला मारला आहे. या धाडसी चोऱीत चोरट्यांनी १० लाखांहून अधिक किंमतीच्या देशी-विदेशी दारूचे १२६ बॉक्स आणि रोख ७० हजार रुपये लंपास केले.
अशोकशेठ नागराणी यांचे महामार्गालगत असलेले हे दारू विक्रीचे दुकान दररोजप्रमाणे मंगळवारी रात्री बंद करण्यात आले होते. मात्र पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी अचूक वेळ साधत दुकानाचे शटर उचकवले आणि आत प्रवेश मिळवला. चोरट्यांनी गल्ल्यातील रोख रक्कम आणि महागड्या दारूच्या पेट्या उचलून नेल्या.
पुरावेही नष्ट ; सीसीटीव्ही डिव्हाइस चोरीला
आपली ओळख लपवण्यासाठी चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे फोडले असून, डिव्हिआर यंत्रही सोबत घेऊन गेले. त्यामुळे पोलिसांसमोर संशयितांची ओळख पटवणे मोठे आव्हान ठरत आहे.
पोलिसांची तत्पर कारवाई, फॉरेन्सिक तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, जिल्हापेठ पोलिस स्टेशन, आणि एलसीबी पथक घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक पथकाने ठसे आणि इतर महत्त्वाचे पुरावे गोळा केले असून, या चोऱ्यामागे कोणते टोळीगत नेटवर्क आहे का, याचा तपास सुरु आहे.
मुख्य महामार्गालगत असलेल्या दुकानात इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेली चोरी ही पोलीस आणि सुरक्षा व्यवस्थेसाठी गंभीर इशारा मानली जात आहे. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे.