चोपडा तालुक्यात ७७७ किलो गोमांस जप्त; चार लाखांचा मुद्देमाल ताब्यात
चोपडा (प्रतिनिधी) : चोपडा तालुक्यात गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक करत असलेले वाहन पकडण्यात आले असून, ७७७ किलो गोमांसासह अंदाजे चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हा प्रकार ८ जून रोजी दुपारी तीनच्या सुमारास माचला ते वड्री रस्त्यावर उघडकीस आला.
गोरक्षकांचा पाठलाग आणि पोलिसांची तत्पर कारवाई :
प्राणींन फाउंडेशनच्या नेहा दीदी पटेल यांच्या नेतृत्वाखालील गोरक्षक पथकाला अंकलेश्वर-बुऱ्हाणपूर महामार्गावरून एक चारचाकी वाहन गोमांस वाहून नेत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी संबंधित वाहनाचा पाठलाग सुरू केला.
पाठलाग चालू असताना वाहनचालकाने पोलिस आणि गोरक्षकांना चकवा देण्यासाठी वाहन एमएच ४३ बीबी ०४०९ हे केळीच्या शेतात, अंदाजे दहा फूट खोल खड्ड्यात उतरवले आणि तेथेच वाहन सोडून फरार झाला.
गोरक्षकांनी यासंदर्भात अडावद पोलीस ठाण्यात संपर्क साधताच पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात, हवालदार विनोद धनगर, संजय धनगर व अन्वर तडवी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
पकडलेला मुद्देमाल :
वाहनातून ७७७ किलो गोमांस आणि संबंधित चारचाकी वाहन असा एकूण अंदाजे चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. फरार आरोपीचा शोध सुरू असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे.