जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणावर गोळीबार!
जळगाव शहरातील घटनेने खळबळ
जळगाव (प्रतिनिधी):– मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या तरुणावर जुन्या भांडणाच्या कारणावरून गोळीबार केल्याचे धक्कादायक घटना गुरुवार 24 रोजी रात्री दहा वाजत सुमारास
एम ज कॉलेज मागील असणाऱ्या मीनाताई ठाकरे मार्केट जवळ घडली. या घटनेत तरुणाच्या कमरेला एक गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला त्याला सुरुवातीला जिल्हा रुग्णालयात नेण्यात येऊन नंतर त्याच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान तरुणावर तीन-चार राऊंड फायर केले मात्र तो बचावासाठी एका घरात लपल्याने बचावला. नंतर घटनास्थळावरून आरोपी पसार झाले.
दादू ऊर्फ महेंद्र समाधान सपकाळे (वय २२, रा. पिंप्राळा हुडको, जळगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. तो आपल्या कुटुंबासह पिंप्राळा हुडको परिसरात राहतो. गुरुवारी रात्री तो मीनाताई ठाकरे मार्केट परिसरात आला असता, याठिकाणी रामनवमीच्या आधी झालेल्या जुन्या वादातून विशाल कोळी व त्याच्या साथीदारांनी त्याच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात महेंद्र सपकाळे यांच्या उजव्या कमरेखाली गोळी लागली असून, नंतर सर्व संशयित आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (LCB) व वरिष्ठ पोलीस अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. गोळीबार स्थळाजवळ एक जिवंत गोळीही आढळून आली असून, या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जात आहे.
महेंद्र सपकाळे याला तातडीने शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृतीची गंभीरता लक्षात घेता त्याला खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. यावेळी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी उसळली होती.
या प्रकरणात जखमी तरुण व हल्लेखोर हे दोघेही सराईत गुन्हेगार असल्याचे प्राथमिक माहितीवरून स्पष्ट झाले आहे, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान आरोपींना पकडण्यासाठी पथके पाठवण्यात आले असल्याची माहिती देण्यात आले.