गुढीपाडव्याच्या दिवशी तरुणाची आत्महत्या ; कुसूंबा गावात शोककळा
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव तालुक्यातील कुसूंबा येथे एका २२ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना गुढीपाडव्याच्या दिवशी (दि. ३० मार्च) घडली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून, एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मयत तरुणाचे नाव महेश ज्ञानेश्वर पाटील (वय २२, रा. कुसूंबा) असे आहे. तो आपल्या कुटुंबासोबत राहत होता आणि एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत चटई कामगार म्हणून कार्यरत होता. गुढीपाडव्याच्या सणाच्या दिवशी संध्याकाळी तो घरी परतला आणि काही वेळानंतर वरच्या खोलीत जाऊन गळफास घेतला.
कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले. मात्र, तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे पाटील कुटुंबीयांवर शोककळा कोसळली असून, संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे.
या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.