कानसवाडा येथे माजी उपसरपंचाची निर्घृण हत्या!
आई-वडिलांच्या डोळ्यासमोर तिघांनी केले चाकूने हल्ले; एक आरोपी अटकेत, दोन फरार
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव तालुक्यातील कानसवाडा शिवारात माजी उपसरपंच आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते युवराज कोळी (वय 35, रा. भादली) यांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वादाचे रूपांतर हत्येत!
३१ डिसेंबर रोजी युवराज कोळी आणि संशयित आरोपी भरत पाटील, देवा पाटील व हरीश पाटील यांच्यात ढाब्यावर वाद झाला होता. याच वादातून २० मार्च रोजी रात्री पुन्हा वाद झाला, मात्र नातेवाईकांनी त्याचे समेट घडवून आणले.
पण, दुसऱ्याच दिवशी, २१ मार्च रोजी सकाळी ८ वाजता, युवराज कोळी आपल्या आई-वडिलांसोबत कानसवाडा शिवारातील शेतात काम करत असताना तिघे हल्लेखोर तिथे पोहोचले. भरत पाटील, देवा पाटील आणि हरीश पाटील यांनी धारदार चाकू आणि चॉपरने युवराज कोळी यांच्यावर सपासप वार केले.
कानसवाडा येथे माजी उपसरपंचाची निर्घृण हत्या!
चाकूने छातीवर गंभीर वार झाल्यामुळे युवराज जागीच कोसळला. त्याला वाचवण्यासाठी त्याचे वडील सोपान कोळी आणि आई धावले, पण हल्लेखोरांनी त्यांना पकडून ठेवले. आपल्या डोळ्यासमोरच मुलाचा निर्घृण खून होताना पाहून त्यांचा हंबरडा फुटला.
परिसरातील शेतकरी आणि गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत तिघे मारेकरी पसार झाले होते. गावकऱ्यांनी जखमी अवस्थेतील युवराज यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
नातेवाईकांचा आक्रोश, पालकमंत्र्यांनी घेतली भेट
युवराज कोळी यांच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांची पत्नी आणि मुलांनी शासकीय रुग्णालयात हंबरडा फोडला. त्यांचे सांत्वन करण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रुग्णालयात भेट देऊन कुटुंबीयांना आधार दिला.
एक आरोपी अटकेत, दोन फरार
या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित आरोपी भरत पाटीलला अटक करण्यात आली आहे. उर्वरित दोघांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.
या घटनेमुळे भादली व कानसवाडा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.