Sunday, June 15, 2025
Homeक्राईमऔरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात दोन गटात संघर्ष : झालेल्या हिंसाचारात अनेक पोलिसांसह नागरिक...

औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात दोन गटात संघर्ष : झालेल्या हिंसाचारात अनेक पोलिसांसह नागरिक जखमी 

औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात दोन गटात संघर्ष : झालेल्या हिंसाचारात अनेक पोलिसांसह नागरिक जखमी 

नागपुरात अनेक भागांमध्ये संचारबंदी

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे फडणवीस आणि गडकरी यांचे आवाहन 

नागपुरात मोठा बंदोबस्त, तणावपूर्ण शांतता

नागपूर: औरंगजेबाच्या कबरीबाबत झालेल्या वादातून नागपूरच्या महाल आणि गांधी गेट परिसरात दोन गटांत भीषण संघर्ष उफाळला. या घटनेत जमावाने मोठ्या प्रमाणात दगडफेक, जाळपोळ आणि पोलिसांवर हल्ला केल्याने तणाव निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या हाणामारीत १५ हून अधिक पोलीस जखमी झाले असून, आतापर्यंत 50 हून अधिक  जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

भारतीय नागरीक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अंतर्गत नागपूर शहरातील अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत अधिसूचनेतून समोर आली आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

सोमवारी सायंकाळच्या सुमारास महाल आणि गांधी गेट परिसरात काही तरुणांमध्ये वाद झाला. पाहता पाहता या वादाचं मोठ्या गटांमध्ये रुपांतर झालं आणि घोषणाबाजी, दगडफेक आणि गोंधळ सुरू झाला. परिस्थिती अधिक चिघळताच काही असामाजिक तत्वांनी वाहनांना आग लावली आणि पोलिसांवरही हल्ला केला.

पोलिसांची तत्काळ कारवाई

गोंधळ वाढल्याने पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलीस फोर्स तैनात केला आणि लाठीचार्ज करून जमाव पांगवला. काही पोलिसांचे कपडे फाटले, तर काहींना गंभीर मार लागला आहे. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत मोहीम राबवत अनेक व्यक्तींना  ताब्यात घेतलं आहे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरकरांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. पोलिसांकडून सर्वसामान्य नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आलं आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे.

दरम्यान नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार, पुढील सूचना मिळेपर्यंत निर्बंध लागू राहतील. कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर येथील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारंबदी लागू करण्यात आली आहे. तसंच, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना प्रभावित भागातील रस्ते बंद करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. संचारबंदीचे उल्लंघन करणारा कोणीही भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ अंतर्गत दंडनीय राहील.

 

ताज्या बातम्या