Friday, June 13, 2025
Homeखानदेशआईच्या डोळ्यादेखत बिबट्याच्या हल्ल्यात ७ वर्षीय बालकाचा मृत्यू

आईच्या डोळ्यादेखत बिबट्याच्या हल्ल्यात ७ वर्षीय बालकाचा मृत्यू

आईच्या डोळ्यादेखत बिबट्याच्या हल्ल्यात ७ वर्षीय बालकाचा मृत्यू

यावल तालुक्यात हृदयद्रावक घटना; वन विभागाकडून तातडीने उपाययोजना सुरू

जळगाव – यावल तालुक्यातील किनगाव येथे गुरुवारी (६ मार्च) दुपारी भयावह घटना घडली. बिबट्याच्या हल्ल्यात ७ वर्षीय आदिवासी बालकाचा जागीच मृत्यू झाला. आईच्या डोळ्यांसमोरच बिबट्याने लहानग्या केशाला फरफटत नेले आणि काही क्षणात त्याचा जीव घेतला. या घटनेमुळे संपूर्ण साकळी आणि किनगाव परिसर हादरून गेला आहे.

आईच्या हाका व्यर्थ ठरल्या…

शेतकरी केतन सुरेश चौधरी यांच्या साकळी शिवारातील शेतात मजुरीसाठी आलेले पेमा बुटसिंग बारेला यांचा मुलगा केश्या बारेला (७) हा आपल्या आईसोबत शेताजवळ खेळत होता. अचानक बिबट्याने झडप घालत त्याला ओढून नेले. आईने जीवाच्या आकांताने मदतीसाठी हाक मारली, मात्र बिबट्याच्या वेगासमोर कोणीच काही करू शकले नाही. काही क्षणातच बिबट्याने त्याच्यावर घात केला आणि त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच यावलचे उपवनसंरक्षक जमीर शेख, सहायक वनसंरक्षक प्रथमेश हडपे यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांसोबत चर्चा करून आवश्यक सुरक्षा उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले. तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, फॉरेन्सिक टीम आणि पोलीस यंत्रणाही घटनास्थळी दाखल झाली. मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.

बिबट्याच्या हालचालींवर नियंत्रणासाठी पिंजऱ्यांची व्यवस्था

या घटनेनंतर संपूर्ण पंचक्रोशीत अलर्ट जारी करण्यात आला असून, नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बिबट्याच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी ओढे आणि पाणीसाठा असलेल्या भागांमध्ये पिंजऱ्यांची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी दिवसाढवळ्या वीजपुरवठा सुरू ठेवण्याचे आदेश वीज वितरण कंपनीला देण्यात आले आहेत.

पालकमंत्री आणि आमदारांकडून तीव्र प्रतिक्रिया

या हृदयद्रावक घटनेनंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी तीव्र दुःख व्यक्त करत वन विभागाला तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. लहानग्या केशाच्या दुर्दैवी मृत्यूनंतर संपूर्ण यावल तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्या