अवैध वाळू वाहतुकीने घेतला १५ वर्षीय मजुराचा बळी; शिरसोदे येथील दुर्घटनेने संताप
पारोळा प्रतिनिधी
तालुक्यातील शिरसोदे येथे आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास बोरी नदीपात्रात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीने १५ वर्षीय अल्पवयीन मजुराचा जीव घेतला. ट्रॅक्टर मागे घेत असताना झालेल्या या भीषण अपघातात मजूर जागीच ठार झाला. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईची मागणी केली असून, ट्रॅक्टर चालकाला अटक करण्यात आली आहे.
शिरसोदे (ता. पारोळा) येथील बोरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा जोरात सुरू असताना MH 19 CY 1236 क्रमांकाच्या ट्रॅक्टरने हा अपघात घडवला. मृत मजूर, देवा उर्फ गौतम गोकुळ भिल (वय १५), हा वाळू उपशाच्या कामात सहभागी होता. ट्रॅक्टरची ट्रॉली मागे घेत असताना त्याला जोरदार धडक बसली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो तात्काळ बेशुद्ध पडला. चालक अजय देवमन भिल याने जखमीच्या भावाला घटनेची माहिती दिली. त्यानंतर बहादरपूर सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
चालक अटकेत, मालकावर गुन्हा
या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ट्रॅक्टर चालक अजय भिल याला वाहनासह ताब्यात घेतले. तसेच, ट्रॅक्टर मालक समाधान शंकर पाटील (रा. शिरसोदे, ता. पारोळा) याच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अपघाताची नोंद करून तपास सुरू केला आहे.
अवैध वाळू वाहतुकीवरून संताप
या दुर्घटनेने परिसरात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. तालुक्यात अवैध वाळू वाहतूक बिनदिक्कत सुरू असून, महसूल आणि पोलीस प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. “ही घटना म्हणजे प्रशासनाच्या नाकर्तेपणाचे फलित आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालून अवैध वाळू वाहतूक बंद करावी,” अशी मागणी स्थानिकांनी लावून धरली आहे.
अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीमुळे नदीपात्रांचे नुकसान तर होत आहेच, पण आता तरुणांचे बळीही जाऊ लागले आहेत. या घटनेने प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, यापुढे अशा दुर्घटना टाळण्यासाठी ठोस पावले उचलली जातील का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.