Sunday, June 15, 2025
Homeखानदेशअवकाळीचा पुनरागमनाचा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली

अवकाळीचा पुनरागमनाचा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली

अवकाळीचा पुनरागमनाचा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली

जळगाव : अवकाळी पावसाने नुकतेच झालेल्या शेतीच्या नुकसानीची जखम कोरडीही नाही, तोच पुन्हा एकदा पावसाचे सावट जिल्ह्यावर निर्माण झाले आहे. येत्या काही दिवसांत गडगडाटी वादळ, विजा आणि वादळी वाऱ्यांसह हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील उरलेले उत्पादन साठवणुकीत असलेले शेतकरी आणि उन्हाळी पिके घेणारे शेतकरी पुन्हा चिंतेत सापडले आहेत.

वेदर वेलनेसच्या अंदाजानुसार, १३ ते १७ मेदरम्यान जिल्ह्यात विविध भागांत ढगाळ वातावरण राहणार असून, दुपारनंतर वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः १३ व १४ मे रोजी वाऱ्याचा वेग ताशी ३५-४० किमीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटाचा धोका असल्याने नागरिकांनी सावध राहावे, असा सल्लाही हवामान विभागाने दिला आहे.

१६ व १७ मे रोजी सायंकाळनंतरही पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर, १८ व १९ मेदरम्यान उन्हाचा तडाखा जाणवणार असून तापमान ४० ते ४३ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे अवकाळी पावसानंतर वाढणाऱ्या उष्णतेचा फटका फळबागा, भाजीपाला आणि उरलेल्या कडधान्य पिकांनाही बसण्याची शक्यता आहे.

हवामानातील सातत्याने होणाऱ्या या बदलांमुळे शेतकऱ्यांच्या नियोजनावर मोठा परिणाम होत असून, विमा कंपन्या व कृषी विभागाकडून तत्पर मदतीची अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना व शेतकऱ्यांना हवामान बदलांबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

ताज्या बातम्या